नाशिक: ऑनलाइन जुगार अड्डा चालविणारी टोळी जेरबंद; एका फ्लॅटमध्ये थाटला होता अड्डा

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरातील गीतांजली कॉलनीत अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून ऑनलाइन जुगार अड्डा इंदिरानगर पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातील सात संशयितांना त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह लॅपटॉप, मोबाईल असा सुमारे सात लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार योगेश जाधव यांच्या फिर्यादीनुसार, गीतांजली नगरमधील तपस्वी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ऑनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याची खबर वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांना मिळाली असता, बुधवारी (ता. २९) मध्यरात्री सापळा रचून छाप टाकला.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

त्यावेळी अपार्टमेंटमध्ये राशू कैलास दरयानी (३४, रा. घोटेगाव, जि. नरसिंगपूर, मध्यप्रदेश), संतोष चंद्राभान जेठवाणी (३८, रा. जरीपटका, नागपूर), राहुल दिवाणसिंग बिस्ट (३०, रा. भुदई उदमसिंग नगर, उत्तराखंड), हितेशकुमार गजेंद्रलाल प्रजापती (२३, रा. सरभोका, छत्तीसगड), कमलसिंग वीरनारायण सिंग (२१, रा. बकाना, टिपरागुडी, जि. सुरजपूर, छत्तीसगड), दीपक हरिशकुमार पोहणी (२३, रा. माधवनगर, कटणी, मध्यप्रदेश), ताजू हदायत माशी (४०, रा. भिलाई पॉवर हाऊस, शारदापूर, छत्तीसगड) हे संशयित सीबीटीएफ ऑनलाइन नावाचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

संशयितांकडून पोलिसांना ५० हजारांचा एक गावठी कट्टाही सापडला. तसेच घटनास्थळावरून मोबाईल, सीमकार्ड, महागडे लॅपटॉप जप्त करण्यात आले. संशयित ऑनलाइन जुगार अड्डा चालवून अनेकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करीत होते. तसेच सदरची रक्कम ते अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यावर ऑनलाइन टाकत होते. सुमारे ६ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जुगार प्रतिबंध अधिनियमास विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ निरीक्षक शेळके तपास करीत आहेत. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790