🪔 रामकुंडावरील बालाजी मंदिरात उद्या लावणार १,००१ दिवे; शनिवारी गोवर्धन पूजा
रामकुंडावरील चतुः संप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन दिवसीय दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दीपोत्सव व अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. १) सकाळी मंदिरात भगवान बालाजी यांच्या मूर्तीला अभिषेक करून आरती करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता १ हजार १०१ दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २) बलिप्रतिपदेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मंदिरात श्री गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी महाआरती करण्यात येणार असून उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिराचे प्रमुख महंत श्री कृष्णचरणदास महाराज व महंत पितांबरदास महाराज यांनी केले आहे.
🪔 गायत्री परिवार युग निर्माण योजना ट्रस्टतर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त शनिवारी गायत्री यज्ञ
गायत्री परिवार युग निर्माण योजना ट्रस्टच्या वतीने शनिवारी (दि. २) दिवाळी पाडव्याच्या दिवशी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. गायत्री मंदिर, मखमलाबादनाका, पंचवटी येथे सकाळी ९ वाजता गायत्री यज्ञास प्रारंभ होणार आहे. या यज्ञास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गायत्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
🪔 ‘लक्षदीप हे उजळले घरी’ गाण्यांची मैफल शनिवारी
लाडशाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळ आणि वाणी कलाकार संघटना यांच्यातर्फे शनिवारी (दि. २) ‘लक्षदीप हे उजळले घरी’ ही गाण्यांची विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त ही मैफल होणार आहे. माहेरघर मंगल कार्यालय, खुटवडनगर येथे सायं. ६ वाजता हा कार्यक्रम होईल. समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मैफलीला उपस्थित राहून अल्पोपाहाराचा आनंदही घ्यावा, असे आवाहन वाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष गिरीश मालपुरे, नवहितगुज महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला कोठावदे यांच्यासह पदाधिकारी, विश्वस्तांनी केले आहे.
🪔 बाजीराव फाउंडेशनतर्फे शनिवारी पाडवा पहाट
इंदिरानगर येथील बाजीराव फाउंडेशनच्या वतीने गायक गणेश कड व सहकारी यांचा ‘पाडवा पहाट’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. २) गामणे मैदान, वासननगर येथे पहाटे ५.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष साहेबराव आव्हाड, पुष्पा आव्हाड, भगवान दोंदे यांनी केले आहे.