नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्याच्या तस्करीसह रोकडच्या वाहतुकीवरही पोलिसांकडून करडी नजर ठेवले जात आहे. सातपूर येथील नाकाबंदीत एका वाहनातून २० लाख ५० हजारांची अवैध रोकड जप्त केली आहे. तर, उपनगर हद्दीतही एका बिगारी काम करणाऱ्याच्या घरातून रोकड व दागिने असा ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी करण्यात आली आहे.
नाकाबंदीमध्ये वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. त्यासाठी पोलिसांचा ताफा तैनात आहे. सातपूर हद्दीतील पिंपळगाव बहुला येथे नाकाबंदीवेळी एका वाहनाची (एमएच १४ केए ५१८४) तपासणी करताना, या वाहनात २० लाख ५० हजारांची रोकड मिळून आली.
पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा असलेल्या या रोकडबद्दल वाहनातील संशयित महेश शरद गिते यास काहीही सांगता आले नाही. यामुळे पथकाचे प्रमुख अजय गवांदे यांच्या ताब्यात ही रक्कम देण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे, निरीक्षक विश्वास पाटील, अंमलदार आहेर, पाटील, बहिरम, महिला अंमलदार परदेशी व महसुल विभागाचे अजय निकम, महेश शेटे यांनी बजावली.
उपनगर हद्दीतील माणिकनगर परिसरात राहणाऱ्या बिगारी काम करणाऱ्या ऋषिकेश माधव वानखेडे याच्याकडे संशयास्पदरीत्या रोकड व दागिने असल्याची खबर उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता, रोकड व दागिने असा ११ हजारांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला. या ऐवजाबद्दल संशयिताकडे चौकशी केली असता, त्यास समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ही रक्कम उपनगर पोलिसांनी जप्त केली आहे. तपास सुरूजप्त रोकड कोणाची आहे. संबंधितांकडे ही रोकड कशी आली. या रोकडचा वापर निवडणुकीसाठी होणार होता का, अशा अनेक प्रश्नांसंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.