नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर, पंचवटी, म्हसरूळ पाठोपाठ उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीने आलेल्या चोरांनी बळजबरीने हिसकावून धूम ठोकल्याची घटना घडली. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या जबरी चोरीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकीकडे दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असल्याने पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरक्त ताण निर्माण झाला आहे. चोरट्यांनी दुसरीकडे ‘दिवाळी’ साजरी करण्यास सुरुवात केली आहे.
जगताप मळा येथील राधेश्याम सुंदर सोसायटीत राहणाऱ्या प्रतिभा विजय माळवे (५३) या रविवारी दुपारी नांदूर नाका येथून बिटको चौकात बसमधून उतरल्या. तेथून त्या रस्त्याने पायी जलतरण तलावाच्या दिशेने जात होत्या. यावेळी दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची ४० हजार रुपये किमतीची पोत ओढून नेली. दुसरी घटना येथून काही अंतरावर असलेल्या डावखरवाडीत काही वेळेत घडली. फिर्यादी वयोवृद्ध शोभा पद्माकर पंडितराव (६०, रा. पंचम सोसा. सद्गुरूनगर) या रविवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास त्रिकोणी उद्यानाजवळ भाजीपाला घेण्यास गेल्या होत्या.
भाजीपाला घेऊन पुन्हा रस्त्याने पायी घरी येत असताना अर्पण सोसायटीजवळ दुचाकीस्वार दोघा सोनसाखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तातडीने गुन्हे गारांचा शोध लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.