नाशिक (प्रतिनिधी): शहरातील खुटवडनगर परिसरात एका व्यापाऱ्याला गहाण ठेवलेले सोने परत न करता उलट त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात वैभव देवरे याचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
देवरे आणि त्याच्या साथीदारांनी व्यापाऱ्याचे मोटारीततून अपहरण केले. तसेच शस्त्राचा धाक दाखवत १५ लाख रुपयांची खंडणी वसुलीची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयित आरोपी हरिभाऊ खैरनार, वैभव देवरे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भाऊसाहेब नामदेव कदम (४५) यांनी काही वर्षांपूर्वी हरिभाऊ खैरनार नावाच्या व्यक्तीकडे १९० ग्रॅम सोने गहाण ठेवले होते.
मात्र, वेळोवेळी विनंती करूनही खैरनार याने कदम यांना त्यांचे सोने परत केले नाही. जेव्हा कदम यांनी आपले सोने परत मागितले. तेव्हा खैरनार याने त्यांना उलट धमकावण्यास सुरुवात केली. त्याचा साथीदार वैभव देवरे आणि इतर दोन अनोळखी इसमांनी कदम यांचे अपहरण केले.
वैभव देवरेने कदम यांना सुरा दाखवत १५ लाख रुपये देण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. देवरे आणि त्याच्या साथीदारांनी कदम यांच्या घरी जाऊन घरातील खिडक्यांच्या काचा फोडल्या, दुचाकीचे नुकसान केले आणि कदम यांना बेदम मारहाण केली. पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वैभव देवरे हा सराईत गुन्हेगार आहे.
‘तुला घरी येऊन फाशी देऊ, नाहीतर चिरडून टाकू’:
👉 कारमध्येच खैरनार याने कदम यांना धमकी देत म्हटले की, ‘माझे व्याजाचे पैसे मिळून तुझ्याकडे माझे १५ लाख रुपये होतात. ते पैसे दिले नाही तर तुला सोने मिळणार नाही.
👉 गाडीत बसलेले हे तिघे आताच मर्डर केसमधून जामिनवर बाहेर आले आहेत. तुला घरी येऊन फाशी देऊ किंवा गाडीखाली चिरडून टाकू, कोणाला कळणार नाही..’ अशा शब्दांत धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
👉 वैभव देवरे यास दोन दिवसांपूर्वी गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यास न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
![]()


