नाशिक (प्रतिनिधी): सिडकोमधील सिंहस्थनगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून २४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. तसेच काही चांदीचे दागिने व रोकड असा एकूण सहा लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी रामराव रघुनाथ लांडगे (रा. जटायू चौक, सिंहस्थनगर) हे आठवडाभर कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
हॉलमध्ये असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकर तोडून १ लाख ३४ हजार रुपये किमतीचे २३ ग्रॅम, ३२ ग्रॅम व १२ ग्रॅम वजनाचे सोन्याची तीन मंगळसूत्र, १ लाख १४ हजार रुपये किमतीच्या ५० ग्रॅमच्या चार बांगड्या, ५८ हजार रुपये किमतीच्या २९ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन साखळ्या, ६८ हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅमचे सोन्याचे दोन नेकलेस, सोन्याचे नाणी, ९० हजार रुपये किमतीची ४५ ग्रॅमची सोन्याची पोत, दोन हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, आठ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅमचे सोन्याचा नेकलेस, सहा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, पाच हजार रुपये किमतीचे २० ग्रॅमचे चांदीचा करंडा, चांदीचे पैंजण, चांदीची समई असा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


