नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता रात्रीही स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. शहरात दैनंदिन कचरा संकलन करण्यासाठी दिवसा होणाऱ्या घंटागाडीच्या फेऱ्यादेखील
वाढविण्यात आल्या असून यासोबतच, पालापाचोळा उचलण्यासाठी प्रत्येक विभागात २ ते ३ घंटागाड्यांची पंधरा दिवसांसाठी संख्या वाढविली आहे. दिवाळीत रस्त्यावरील तसेच घरांमधील कचऱ्यासोबतच महापालिकेला मोकळ्या भूखंड तसेच शालिमार, मुंबईनाका, गंगापूररोड, अशोकस्तंभ, पंचवटी या भागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
ही बाब लक्षात घेता दिवसा आणि रात्री देखील स्वच्छतेसह प्रभागनिहाय २ घंटागाड्या तैनात केल्या जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ आवेश पलोड यांनी दिली. सणासुदीमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.