नाशिक: ११ वर्षीय मावस भावाने गळा आवळल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या दोन वर्षांचा चिमुरडा माती खात असल्याने त्यास मावस भावाने मारले. त्यानंतर चिमुरडा रडू लागल्याने त्यास शांत करण्याऐवजी चिमुरड्याचा गळा दाबला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या ११ वर्षीय मावस भावाविरोधात चिमुरड्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरची बाब शवविच्छेदन अहवालानंतर ११ दिवसांनी उघडकीस आला आहे.

वीर बोके (वय २, आडगाव शिवार) असे मयत झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार देवरे यांच्या फिर्यादीनुसार, ९ तारखेला दोन्ही कुटूंबिय कामावर गेले होते. तर घरी दोघे मावस भाऊ होते. मयत वीर हा आधीच आजारी होता. त्यातच तो दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना माती खात होता. हे त्याचा मावस भावाने पाहिले. त्याने वीरला मारले.

हे ही वाचा:  नाशिक: पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून युवकावर कोयत्याने हल्ला

या मारहाणीत तो घराबाहेर असलेल्या खडीवर पडला. त्यामुळे वीर अधिकच रडू लागला. तो जास्तच रडत असल्याने ११ वर्षीय मावस भावाने त्यास शांत करण्याऐवजी त्याचा गळा दाबला. काही मिनिटांमध्ये वीर नीपचित पडला. तो काहीही हालचाल करीत नसल्याने मावस भाऊ घाबरला. त्याने शेजारी राहणाऱ्यांना आवाज दिला. कुटूंबियही घरी आले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

शवविच्छेदन अहवालाने उकल:
दरम्यान, मयत वीरचा शवविच्छेदन अहवालात वैदयकीय अधिकाऱ्यांनी जो अभिप्राय दिला, त्यात वीरचा मृत्यु नैसर्गिक नव्हे तर गळा दाबून झाल्याचे उघडकीस आले. याची माहिती आडगाव पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, वीरच्या ११ वर्षीय मावस भावाकडे या प्रकारची विचारणा केली. त्यावेळी त्याने त्यादिवसाचा घटनाक्रम सांगितल्यानंतर वीरच्या मृत्युमागील कारण समोर आले. याप्रकरणी याच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक उपनिरीक्षक निकम हे करीत आहेत. (आडगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३००/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790