मोठी बातमी: विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट; एसटीची भाडेवाढ रद्द !

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून घोषणा आणि योजनांची बरसात केली जात आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. मुंबईतील टोल नाक्यावरील हलक्या वाहनांचा टोल रद्द करण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला आहे. आता दरवर्षी दिवाळीत महिन्याभरासाठी एसटीची करण्यात येणारी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने ही दिवाळी भेटच दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा:
दरवर्षी दिवाळीला अनेक लोक आपल्या घरी जातात. त्यासाठी लाखो लोक रेल्वेने तर लाखो लोक परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. तसेच बरेच जण सुट्यामुळे पर्यटनस्थळी फिरण्याचे नियोजन करतात. या दरम्यान झालेली गर्दीचा फायदा उचलत खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ भाडेवाढ केली जाते. त्याचवेळी दरवर्षी एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. यंदाही ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान करण्याचे परिपत्रक काढण्यात आले. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

कोणत्याही बसमध्ये भाडेवाढ नसणार:
एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी हा मार्ग स्वीकारला होता. परंतु आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790