नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या संशयित चोरट्याला अंबड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ घरफोड्यांची उकल झाली आहे.
यात अंबड पोलिसांनी तब्बल साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पत्रकार परिषदेत अंबड पोलिसांनी दिली. संशयिताचे नाव फारुक रजाक काकर (वय ४८, रा. भद्रकाली, मूळगाव: पाचोरा, जि. जळगाव) असे आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४ या चालू वर्षात विविध घरफोडीचे गुन्हे दाखल होते. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावत यांच्या पथकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता.
पथकाचे मयूर पवार व समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित फारुख काकर याला भद्रकाली परिसरातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने अंबडच्या वेगवेगळ्या भागातून आठ ठिकाणी घरफोडीची कबुली दिली.
त्याच्याकडून १८८ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५६ ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण १३ लाख ५४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट, झनकसिंग गुनावत, किरण रौंदले, समाधान शिंदे, मयूर पवार, कुणाल राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, मते, निकम, पाटील, बारगजे आदींनी केली आहे.