नाशिक: दगडफेक प्रकरणात 5 जण ताब्यात; दोघे जखमी रुग्णालयात दाखल…

नाशिक (प्रतिनिधी): बडी दर्गा जलकुंभ परिसरात दगडफेकप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (ता.२३) पाच संशयीतांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन संशयितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.

पिंझारघाट जलकुंभ परिसरात अंधारात मद्यसेवन करताना दोन गटांत रविवारी (ता.२२) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास वाद झाला. वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ला आणि दगडफेकीत झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक केली तर मुन्ना कासार आणि राहुल नंदन यांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

दगडफेकीच्या घटनेने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. बडी दर्गा परिसरासह संपूर्ण जुने नाशिक भागात पोलिस बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. एका संशयितास तत्काळ ताब्यात घेतले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

अन्य संशयितांपैकी काही तासातच आणखी चार संशयीतांना ताब्यात घेतले. श्रवण संजय गावित (वय१९, रा. पाटील गल्ली बुधवार पेठ), जयू ऊर्फ जयेश सुरेश जाधव (वय १९, रा. रविवार कारंजा), आकाश भुजंगे ऊर्फ डोंगर अशा तिघा संशयीतांना अटक केली आहे. तर मुन्ना कासार आणि राहुल नंदन यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक रमेश शिंदे यांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सूरज भुजंगे, अवधूत जाधव यांचा तपास पोलिस करत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

श्रवण गावित, जयेश जाधव, आकाश भुजंगे अशा तिघांना सोमवारी (ता.२३) दुपारी न्यायालयात हजर केले. त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790