नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड ते सिन्नर फाटा या महापालिकेच्या उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
बुधवारी (दि. १८) गाडेकर मळा, फाटा सिन्नर येथे राहणारा 29 वर्षीय युवक अमित राजेंद्र मिश्रा हा सकाळी कामावर जात असताना उड्डाणपुलावर खड्डे टाळत पुढे जात असताना पाठीमागून येत असलेल्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात अमित याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व युवकाचे काका अनिल मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमित मिश्रा हे इंदिरानगर येथील डब्ल्यूएनएस या कंपनीत काम करीत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १५ जी एस २९२५) वरून उड्डाणपुलावरून दत्त मंदिराच्या दिशेने जात होते.
उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे झाल्याने खड्डा चुकवित असतांना पाठीमागून आलेल्या ट्रक (एमएच १५ एफव्ही ९८९१) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला, विशेष म्हणजे त्यांचे हेल्मेट देखील तुटले. अमित मिश्रा त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. ट्रक चालका संतोष रामचंद्र पोरजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.