नाशिक (प्रतिनिधी): काझी गढीच्या काठावरील तीन घरे कोसळल्याची घटना शनिवारी (ता. १४) दुपारी घडली. चौथ्या घरास तडा गेल्याने गढी आणखी धोकादायक झाली आहे. कधीही कोसळण्याची शक्यता आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचा सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
दुपारी साडेबाराच्या सुमारास गढीच्या काठावरील गुलाब परदेशी, लीलाबाई परदेशी आणि अलका साळुंके अशा तिघांचे घरे गढीच्या खाली कोसळली. तर पप्पू डोंगरे यांच्या घरास तडा गेला आहे. संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. पायथ्याशी जनावरांचा गोठा आणि साईबाबांचे मंदिर आहे. गोठा आणि मंदिराच्या अवघ्या काही अंतरावर घरांचा मलबा कोसळला. थोडक्यात जनावरे बचावली. शिवाय गोट्यास लागून असलेले काळे कुटुंबीयांचे घरदेखील बचावल्याने अनर्थ टळला. आठ दिवसापासून पावसामुळे माती वाहून गेल्याने काहीसा आवाज परदेशी कुटुंबीयांना येत होता.
शुक्रवार रात्रीपासून सतत पाऊस सुरू असल्याने त्यांच्या भीतीत भर पडली. दोन्ही घरातील परदेशी कुटुंबीय आणि साळुंखे घराच्या पुढील भागात बसून होते. शनिवारी दुपारी त्यांची भीती खरी ठरली आणि तीनही घरे अचानक कोसळली. त्यात थोडक्यात बचावल्याच्या प्रतिक्रिया कुटुंबीयांकडून देण्यात आल्या. महापालिकेकडून संरक्षण भिंत बांधली जात नसल्याने संभाव्य धोका लक्षात घेता परदेशी कुटुंबीयांकडून आरसीसी काँक्रिटीकरणाची संरक्षण भिंत घराच्या मागील बाजूस उभी केली होती.
माती ढासळल्याने भिंतीचाही पाया खचला आणि घरासह काँक्रिट भिंत कोसळली. गेल्या महिन्यातही अशाप्रकारे काठावरील दोन घरे कोसळण्याची घटना घडली होती. दरवर्षी घटना घडत आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासनास मात्र जाग येत नसल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करून संरक्षण भिंत बांधल्यास अशा घटनांना आळा बसेल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
प्रशासनाकडून पंचनामा: घटना घडल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका पश्चिम विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. घडलेला घटनेचा सविस्तर पंचनामा केला. पीडित कुटुंबीयांसह अन्य धोकादायक घरातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. गढीच्या पायथ्याशी साईबाबा मंदिर आहे. तसेच काळे कुटुंबीयांचे घर आणि जनावरांचा गोठादेखील आहे.घर कोसळण्याचा आवाज झाल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली. अचानक जोरदार आवाजात तीनही घरे खाली कोसळली. साईबाबांची कृपा त्यामुळे गोठा आणि मंदिराच्या अवघ्या काही अंतरावर कोसळलेला संपूर्ण मलबा येऊन थांबला. त्यामुळे सुदैवाने जनावरे थोडक्यात बचावली. तर परदेशी आणि साळुंके कुटुंबीय यांनी देखील खबरदारी घेतल्याने बालबाल बचावले.”दोन दिवसांपूर्वीच महापालिका आणि जिल्हा प्रशासनास तक्रार केली होती. पावसाने सतत माती ढासळत असल्याने घर धोकादायक झाले होते. स्वखर्चातून संरक्षण भिंत घराच्या मागे उभी केली होती. भिंतीचा पायाच ढासळल्याने घरासह भिंत कोसळली. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी. झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी.”- गुलाब परदेशी, रहिवासी.