नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): घरगुती कामासाठी बँकेतून ५ लाखांची रोकड काढून घराकडे परतत असतानाच, रस्त्यात किराणा दुकानातून वस्तू घेण्यासाठी थांबले. त्यावेळी अवघ्या काही मिनिटात ते परत आले असता, त्यांच्या मोपेडच्या डिक्कीतील पाच लाखांची रोकड चोरट्यांनी शिताफीने लंपास केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासाकामी ताब्यात घेतले आहेत.
संजय पांडुरंग मंडलिक (६५, रा. गजानन कृपा बंगला, पेंढारकर कॉलनी, जिजामाता नगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नाशिकरोडच्या एसबीआय बँकेमध्ये त्यांचे खाते असून, घरगुती कामासाठी त्यांना पैसे लागत होते. त्यासाठी ते बुधवारी (ता. ११) दुपारी एसबीआय बँकेत गेले. बँकेच्या खात्यातून ५ लाख रुपये काढले आणि ती रोकड त्यांनी त्यांच्या ज्युपीटर मोपेडच्या (एमएच १५ एचडब्ल्यु ०२३८) डिक्कीत ठेवले.
त्यानंतर ते घराकडे परतत असताना, रेल्वे स्टेशनरोडवर असलेल्या किराणा दुकानासमोर फरसाण घेण्यासाठी थांबले. अवघ्या काही मिनिटात ते दुकानातून फरसाण घेऊन परत आले असता, डिक्कीत फरसाण ठेवण्यासाठी उघडली. त्यावेळी डिक्कीत पाच लाखांची रोकड नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. याप्रकरणी तत्काळ नाशिकरोड पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सूर्यंवंशी हे तपास करीत आहेत.
पाळत ठेवून केलेले कृत्य: मंडलिक यांनी बँकेतून रोकड काढत असतानाच त्यांच्या काही संशयितांनी पाळत ठेवली असावी अशी शक्यता आहे. त्यानंतर संशयितांनी त्यांचा पाठलाग केला आणि नेमकी संधी त्यांना मिळाली, जेव्हा ते किराणा दुकानासमोर थांबले.अवघ्या तीन ते चार मिनिटांमध्ये संशयितानी डिक्की उघडून रोकड लंपास केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला असून, संशयित लवकरच जेरबंद होण्याची शक्यता तपासी अधिकारी सहायक निरीक्षक सूर्यंवंशी यांनी व्यक्त केली आहे.