नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास दगड व धारदार शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. प्रतीक बाळासाहेब लांडगे (३५) यांनी रूग्णालयात दाखल असतांना दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लांडगे यांचा हरवलेला मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने मुख्य संशयित सोनू वाघ याने त्यांना गंगापूररोड, गोदावरी नदीकाठ परिसरात फसवून नेले व ५-६ महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून सोनू वाघ व त्याचा सहकारी यांनी लांडगे यांना दगडानेव धारदार शस्त्राने अनेकवार करून जिवे मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केले. या गुन्ह्याचा तपास करत असतांना गुन्हे शोध पथकाचे हवालदार अनिल जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोन्या वाघ हा नाशिकरोड येथे येत आहे.
दरम्यान, यावरून पोलीस पथकाने प्रथमेश उर्फ सोन्या अजय वाघ (२०, रा. जुना गंगापूर नाका, मंगलवाडी, चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक) यास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार ऋतुराज विजय सोनवणे (२०, रा. चांदसी, गंगापूर, नाशिक) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ऋतुराज यास पाचबोटी सर्कल, गंगापूर रोड येथे सापळा रचून अटक केली. दोन्ही संशयितांना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.