स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप वाव आहे. शहराचा विस्तार होत असताना योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने क्षेत्र निश्चित केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळविणे सोयीचे होईल. कृषी आणि पशुधनाच्या विकासावरही विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासालाही चालना देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

औद्योगिकदृष्टीने विकसित होणाऱ्या नाशिकसारख्या शहरात तंत्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधांनीयुक्त संस्था असणे गरजेचे आहे. आयआयएम, आयआयटी दर्जाच्या सुविधा असणाऱ्या तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्था येथे गरजेच्या आहेत. शासनस्तरावरही याबाबतचा विचार करण्यात येईल, असे राज्यपाल राधाकृष्णन सांगितले.

राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनांच्या जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीबाबत राज्यपाल राधाकृष्णन यांनी सविस्तर माहिती घेतली. महसूल दस्तावेजचे डिजिटायझेशन, राज्यात सेवा हक्क कायद्याची चांगल्यारीतीने अंमलबजावणी होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या हक्कांची योग्यरितीने जपणूक व्हावी. बचत गटांना आदिवासी भागात पोषण आहार पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. वायनरीच्या

गरजेनुसार द्राक्ष पिकाबाबत संशोधनाला चालना देण्यात यावी, कांदा प्रक्रिया उद्योगाबाबतही प्रयोग व्हावेत. त्यासाठी बाजाराची मागणी आणि पुरवठा साखळीचा अभ्यास व्हावा. शासन प्रक्रिया उद्योगांना सहकार्य करीत असल्याने अशा उद्योगांना चालना देता येईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. कृषी विकासाच्या बाबतीत विशेषतः द्राक्षे आणि कांदा पिकाच्या बाबतीत अधिक संशोधन होण्याच्यादृष्टीने कृषी विद्यापीठांशी सहकार्य करून त्याला गती द्यावी, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

जल जीवन मिशन, पीएम किसान, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी घेतली. नाशिक शहराने स्वच्छ भारत अभियानात यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी, राज्यपालांनी जिल्हा प्रशासन महानगरपालिका, आदिवासी विकास, पोलिस विभाग यांच्या संदर्भातील विविध बाबीवर चर्चा केली.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी, शहर आणि लगतच्या परिसर विकासासाठी पायाभूत बृहत् आराखडा करण्याची गरज व्यक्त केली. येथील परिसर पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. याबाबत आराखडा तयार करून सादर करण्याची सूचना राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली. कुंभमेळ्याची पूर्वतयारी करतांना विकासकामांचे योग्य नियोजन करावे अशी सूचना राज्यपालांनी केली.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी, जिल्ह्यात तंत्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. त्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात रोजगार निर्मितीच्या अधिक संधीसाठी आयटी पार्क उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीनंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत  जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790