नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात सायबर गुन्हेगारीचे बळी थांबता थांबत नसून देवळाली कॅम्प भागात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीला मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत तब्बल ७ कोटी रुपये ऑनलाइन पद्धतीने अवघ्या आठवडाभरात उकळल्याची धक्कादायक घटना घडली. शहर सायबर पोलिसांनी त्वरित त क्रारीची दखल घेत ऑनलाइन अॅप्लिकेशनद्वारे बँक खात्यांची माहिती घेत त्यांना ई-मेल पाठवून ३ कोटी रुपये ‘फ्रीज’ करण्यास यश मिळविले आहे.
मुंबईच्या खार भागातील रहिवासी असलेल्या फिर्यादी वृद्धाने तेथील राहते घर विकसित करण्यासाठी दिले. तसेच एक दुकानाची विक्री केली. यामुळे त्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम आलेली होती. त्यांनी ती वेगवेगळ्या बँकांच्या बचत व चालू खात्यातजमा केलेली होती सायबर चोरांनी ही बाब हेरून त्यांच्याशी २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत संपर्क साधला.
स्वतःला सीबीआय, सीआयडी, ईडी यांसारख्या संस्थांमधील अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार हे संशयास्पद असून, मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात कारवाई करण्याची धमकी दिली. यासाठी त्यांनी दोन मोबाइल क्रमांकाचा वापर करत बनावट सीआयडीचे स्काईप अकाउंट सुरू करून संपर्क साधला होता.
आम्ही व्हिजिलन्स टीमसोबत अन् गोपनीय शाखेचे पोलीस आहोत असे सांगितले. याचवेळी संशयितांनी वृद्धाचे आधार कार्ड कुठूनतरी मिळविले आणि त्यावरील क्रमांक सांगून विश्वास संपादन केला.
तुमच्या बँक खात्यांवरील आर्थिक व्यवहार हे पूर्णतः संशयास्पद असून सीआयडी, ईडी आणि सीबीआय या सरकारी संस्थांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तुम्हाला कधीही अटक केली जाऊ शकते, असा धाक दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिस पुढील तपस करत आहेत.
वृद्धाला पाठविले बनावट ‘वॉरंट’:
मनी लाँड्रिगचा धाक दाखवून वेगवेगळ्या मोठ्या प्रशासकीय आर्थिक गुन्हेगारीला चाप लावणाऱ्या सरकारी संस्थांचा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी बनावट अटक वॉरंटदेखील या वृद्धाला पाठवून दिले. यामुळे ते प्रचंड घाबरून गेले. त्यांचा या तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास बसला आणि त्यांनी त्यांना खरेखुरे पोलिस अधिकारी समजून ते जसे सांगत गेले, तसे यांनी केले. वृद्धाला विविध चार बँक खात्यांत रक्कम भरण्यास भाग पाडले. वृद्धाने एकूण सहा कोटी ८० लाख रुपये बँक खात्यांत जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले.