नाशिक (प्रतिनिधी): मान्सूनचा आस हा त्याच्या सरासरीच्या जागेपेक्षा दक्षिणेकडे असल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील सहा जिल्हे वगळता उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यात ८ ते १२ सप्टेंबर या पाच दिवसांत अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित ३० जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यातही नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या पंधरा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याचेही खुळे यांनी सांगितले. रविवारी राज्यातील कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सांगली, डहाणू, चंद्रपूर या ठिकाणी दुपारी हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील बहुतांश धरणे ९५ ते १०० टक्के भरली आहेत. गंगापूर व दारणा धरणसमूहांमध्ये ९५ टक्के साठा आहे. नाशिक व नगरमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडीही ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे आता पडणाऱ्या पावसानंतर प्रत्येक धरणातून विसर्ग केला जाणे अत्यावश्यक ठरणार असून नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.