नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला आणखी दहा ई-बस उपलब्ध झाल्या आहेत. यातून विभागाकडे उपलब्ध एकूण ई-बसची संख्या २४ झाली आहे. या ई-बस सप्तशृंग गड, त्र्यंबकेश्वर यासह शिर्डीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासह पर्यावरण संवर्धनाचा ध्यासदेखील बाळगता येईल. सिन्नरसाठीदेखील ई-बस उपलब्ध असेल.
महाराष्ट्र ई-वाहन धोरण २०२१ नुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे किमान १५ टक्के वाहने इलेक्ट्रिक प्रकारातील असावी, असे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यस्तरावर पाच हजार १५० इलेक्ट्रिक बस चलनात आणल्या जाणार आहेत. पहिल्या टप्यांत नाशिक विभागाला चौदा ई-बस उपलब्ध झाल्या होत्या. या बसेस नाशिक-बोरिवली, नाशिक-सप्तशृंगी गड, नाशिक-त्र्यंबकेश्वर, आणि नाशिक-शिर्डी या मार्गावर उपलब्ध केल्या होत्या. आता दुसऱ्या टप्यांत आणखी दहा ई-बस प्राप्त झाल्या आहेत. बुधवार (ता.२८) पासून या बस नाशिक-शिर्डी, नाशिक-सिन्नर, व नाशिक-त्र्यंबक या मार्गावर चालविल्या जाणार आहेत.
कुठून, किती वाजता ?:
बुधवार (ता.२८) पासून या ई- बस भाविक प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होतील. सकाळी पाच ते रात्री दहादरम्यान एक तासाच्या फरकाने बस नाशिकहून सिन्नर, त्र्यंबकेश्वरसाठी नवीन सीबीएस बसस्थानकावरून सुटतील. शिर्डीसाठी बसगाडी महामार्ग बसस्थानकावरून उपलब्ध असेल. शिर्डीसाठी सकाळी साडेसहा, सात, आठ वाजता, तसेच दुपारी तीन, साडेतीन, साडेचार वाजता व अखेरची बस सायंकाळी सातला सोडली जाईल.
तिकीट दर:
नाशिक-सिन्नर: फुल- ६५, हाफ- ३५
नाशिक-शिर्डी: फुल: २२०, हाफ- ११५
नाशिक-त्र्यंबक: फुल- ६५, हाफ- ३५
सदर बसची वैशिष्टे खालीलप्रमाणे.
1) पर्यावरणपुरक सेवा.
२) सदर बस सेवेमध्ये ५ ते १० वर्षा पर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटाची सवलत अनुज्ञेय राहील.
३) सदर बस सेवेमध्ये महिला, अमृत जेष्ठ नागरीक, जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे साथीदार अर्जुन / द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, विद्यमान तसेच माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या विरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास अनुज्ञेय राहील. सदर पर्यावरणपुरक सेवेचा लाभ घ्यावा.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790