नाशिक (प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे ९ धरणे शंभर टक्के भरली असून, ७ धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने १७ धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे जायकवाडीकडे सोमवारपर्यंत सुमारे २५ दशलक्ष घनफूट इतके पाणी रवाना झाले आहे.
जिल्ह्यात सुरगाणा, पेठसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोमवारीही या तालुक्यांमध्येही पावसाचा जोर कायम राहिला. गेल्या २४ तासांमध्ये सुरगाणा तालुक्यात १८३ किलोमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, पेठमध्ये १०० तर त्र्यंबकेश्वरी ८६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळवण आणि दिंडोरी येथेही ७९ व ७८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, या पाच तालुक्यांत अतिवृष्टीची परिस्थिती आहे.
गंगापूरसह अन्य धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसह अन्य नद्यांमधील पाणीपातळी कमालीची वाढली आहे. मंगळवार (दि. २७) पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790