नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या निवड चाचणीत एकोणीस वर्षाखालील बॅडमिंटन चे मिश्र दुहेरीच्या भारतीय संघात आपल्या नाशिकमधील श्रावणी ममता देवेंद्र वाळेकर हिची निवड झाली. नाशकातील एखाद्या खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड होण्याचा योग तसा दुर्मिळच….
कुठल्याही क्रीडा प्रकारात प्रत्येक खेळाडूस आपल्या देशाचा तिरंगा छातीवर अभिमानाने मिरवत, देशासाठी खेळणे हे एक मनापासून जोपासलेले स्वप्न असते. त्यासाठीच तो/ती जीव तोडून कष्ट करत असतो. त्यामुळेच श्रावणी ची ही प्रगती अभिनंदनास पात्र ठरते.
श्रावणीचा इथवरचा प्रवास आम्ही अगदी जवळून पाहिला आहे. ही बातमी कळल्यापासून माझे मन भूतकाळात जाऊन आले. तिच्यातील स्पार्क ओळखून तिच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून तिच्या पालकांनी कष्ट घ्यायला सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून आयआयटी चे क्लासेस लावणारे पुष्कळ आहेत, पण एखाद्या खेळात आपल्या अपत्याला झोकून देण्यास प्रवृत्त करणे आणि त्यासाठी सर्वकाही पणाला लावून कष्ट करणे यात खूप वेगळेपण आहे. भविष्याची कुठलीही शाश्वती नसते खेळात. पण मुलांसाठी त्यांनी हे केलंय. श्रेयसला (श्रावणीचा मोठा भाऊ) क्रिकेट आणि श्रावणी ला बॅडमिंटन मध्ये करिअर करण्यास प्रोत्साहित केले. श्रेयस सुद्धा महाराष्ट्राकडून खेळला आहे.
श्रावणीची झेप स्फूर्तिदायक नक्कीच आहे पण त्याचवेळी त्यासाठी वाळेकर कुटुंबाने उपसलेले कष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. एकदा आम्ही दोन्ही कुटुंबे कोकणात सहलीला गेलो होतो, तेव्हा श्रावणी जन्माला सुद्धा आली नव्हती. म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षे झाली त्या गोष्टीला. पण त्या नंतर वाळेकर कुटुंब कुठल्याही सहलीला गेले नाहीत. श्रावणीसोबत वेगवेगळ्या स्पर्धांसाठी ममता, पायाला भिंगरी लागल्यागत, अख्खा भारत फिरली. आणि त्याच वेळी देवेंद्र इकडे एकटा, कधी खिचडी करून, तर कधी गाडीवरची भुर्जी खाऊन महिनोनमहिने राहिला. हा त्याग साधा नक्कीच नाही.
श्रावणीचं कोचिंग, आहार, निरनिराळ्या स्पर्धांसाठी जाण्याचा खर्च, तिथला राहण्याचा खर्च हा वर्षाला कित्येक लाख रुपये सहज होत असेल. एका मध्यमवर्गीय, इमानेइतबारे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरसाठी हा नक्कीच जास्त आहे. त्या दोघांनी फॅमिली व्हेकेशन घेतलं नाही, गेल्या पंधरा वर्षांत घर बदललं नाही किंवा नवी गाडी घेतली नाही. डॉ. ममता ने स्वतःच्या प्रॅक्टिस ला तिलांजली दिली. म्हणूनच सुरुवातीला श्रावणीचं संपूर्ण नाव (आईच्या नावासकट) लिहिलं आहे. त्या माऊलीच्या नावाच्या उल्लेखाशिवाय श्रावणी चं कौतुक अपूर्ण आहे. उत्कृष्ट पालकत्वाचा यापेक्षा वेगळा दाखला काय असू शकतो?
आर्थिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात किंवा राजकीय असा कुठलाच वारसा नव्हता या कुटुंबाकडे. पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ देवेंद्र ने स्वतःचं क्रीडाप्रेम मुलांमध्ये पाहिलं, त्यांच्या क्षमतांना खतपाणी घालून जोपासलं आणि डॉ सौ ममताने तितक्याच समर्थपणे त्याला साथ दिली. ध्येयाप्रती अविचल निष्ठा आणि ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष प्रयत्न ही या कुटुंबाची खासियत. हाच त्यांचा वारसा. वाळेकर कुटुंबाने हा एक प्रकारचा यज्ञ केला आहे, ज्यात त्यांनी सर्वसाधारण सुखाच्या गोष्टीचं तर्पण केले आहे.
म्हणूनच श्रावणी ने सुद्धा इतर मुलांसारखी दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टी उपभोगली नाही. ती मनमुराद भटकली नाही. मैत्रिणींसोबत गप्पा मारत भटकली नाही. तिने कधीही मनभरून जंक फूड खाल्ले नाही. हे तिच्या वयाच्या किती मुलींना वर्षानुवर्षे जमेल?
नाशिकच्या शिवसत्य मंडळाच्या मैदानावर मकरंद देव यांचे तिला सुरुवातीपासून आजपर्यंत सातत्याने मार्गदर्शन लाभले. तसेच नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळत, जिंकत तिने गेल्या वर्षी पदुकोण अकादमी मध्ये प्रवेश मिळविला. प्रकाश पदुकोण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा तिच्यावर खूप मेहनत घेतली.
आजवर मुंबईच्या तारीणी सुरी सोबत मुलींच्या दुहेरीत तिने अनेक स्पर्धा जिंकल्या. तसेच या वर्षीच्या खेलो इंडिया मध्ये मुलींचं दुहेरीतील विजेतेपद मिळविले. मागील महिन्यात इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई बॅडमिंटन जेतेपदाच्या स्पर्धांमध्ये भारताकडून खेळली. आणि आज ती पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे.
त्यांच्या त्यागाला, कष्टाचे सातत्त्याला, श्रावणी च्या समर्पण वृत्तीला आणि उत्कृष्ट कौशल्याला सलाम. संपूर्ण वाळेकर कुटुंबीयांचे अभिनंदन आणि भारताच्या बॅडमिंटन इतिहासात एक नवा अध्याय रचण्यासाठी श्रावणीला मनःपूर्वक शुभेच्छा.
-डॉ. राजेंद्र कुलकर्णी.
नाशिक, २४/०८/२०२४