नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुने सीबीएस येथे हॉटेलमध्ये नेऊन मैत्रीण असलेल्या तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. १२ जानेवारी २०२१ रोजी खुनाची घटना घडली होती.
साडेतीन वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागला, आरोपी तन्मय प्रवीण धानवा (२१, रा. मासवन, ता.जि. पालरघर) याने अर्चना सुरेश भोईर (२१, रा.बोईसर, जि.ठाणे) हिचा खून केला होता. दोघांची ओळख होती. अर्चना ही नाशिकमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. नंतर दोघांमध्ये वाद झाले.
तेव्हा तन्मय हा अर्चना हीस कॉलेजमध्ये गाठून सोबत येण्यासाठी तगादा लावत होता. एकदा त्याने अर्चनास कॉलेजवळ मारहाणही केली होती. सर्वांसमोर वाद नको म्हणून अर्चना ही तन्मयसोबत जाण्यास तयार झाली. तो तिला हॉटेलमध्ये घेऊन आला तेव्हा अर्चनाही कोणासोवत तरी बोलत असल्याचा संशय आरोपी तन्मय यास आला. दोघांमध्ये वाद झाला. त्याने अर्चनाचा तेथेच गळा आवळून व भिंतीवर डोके आपटून खून केला.
सरकारवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी घटनेचा तपास केला व पुरावे गोळा केले. न्या. एन. व्ही. जिवणे यांनी निकाल दिला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले. मृत अर्चनाचे वडील सुरेश भोईर (४७) यांनी फिर्याद नोंदविली होती.