नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कुरिअरच्या टपालात ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत व सीबीआय, ईडीमधून बोलत असल्याचे भासवीत भामट्यांनी दोघांची आर्थिक फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये उच्चशिक्षित डॉक्टरांचाही समावेश आहे.
१७ ते २५ मेदरम्यान भामट्यांनी दोघांना ३० लाख ७४ हजार ८०६ रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार डॉ. सुबोध गोविंद परदेशी यांना १७ ते २५ मे दरम्यान भामट्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांच्या नावावर येणाऱ्या फेडएक्सच्या कुरिअरच्या टपालात ड्रग्ज आढळल्याचे सांगितले.
तसेच आधार क्रमांक व मोबाईल चुकीच्या कामासाठी वापरला जात असल्याचे सांगत स्काईप व्हिडिओ कॉलवर जोडण्यास भाग पाडले. यानंतर मुंबई पोलिस, सीबीआय, ईडीमधून बोलत असल्याची बतावणी करून डॉ. परदेशी यांच्यासह जोगेंदर सिंह यांना मनी लॉन्डरिंग केसमध्ये अटकेची धमकी दिली.
या खटल्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांवर डॉ. परदेशी यांना २३ लाख १० हजार ६७७ रुपये तर जोगेंद्र सिंह यांना ७ लाख ६४ हजार १२९ रुपये अशा एकूण ३० लाख ७४ हजार ८०६ रुपये वर्ग करण्यास भाग पाडत आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सतर्क राहण्याचा सल्ला: ऑनलाइन पद्धतीतून आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला सायबर सेल पोलिस ठाण्यातर्फे दिला आहे. अशा स्वरूपाच्या फसव्या कॉल किंवा संदेशांना बळी न पडता कुठल्याही स्वरूपात जोखमीचा आर्थिक व्यवहार करू नये, असेही सूचित केले आहे. (सायबर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५९/२०२४)