नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्याने एका तरुणाच्या बँक खात्यातून ७ लाख ११ हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यावर परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अजय राजेश मेश्राम (वय ३२, रा. सुभाष रोड, पवारवाडी, नाशिकरोड) यांचा चायनिज फूड स्टॉल आहे. मेश्राम यांना दि. २० जुलै रोजी व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावरून युनियन बैंक ऑफ इंडियाकडून व्हॉट्सअॅप मेसेज पाठविल्याचे अज्ञात इसमाने फोनद्वारे भासविले. त्यानंतर बँकचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंकमार्फत आधारकार्ड अपडेट युनियन बैंक एपीके हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याद्वारे फिर्यादी मेश्राम यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन त्यांच्या संमतीशिवाय परस्पर ऑनलाईन बँकिंगद्वारे मेश्राम यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या नाशिकरोड शाखेतील बचत खात्यातून ३ लाख ९१ हजार रुपये व कॉर्पोरेशन बँकेच्या नाशिकरोड शाखेतील बचत खात्यातील ३ लाख २० हजार अशी एकूण ७ लाख ११ हजार रुपयांची रक्कम इतर बँक खात्यांमध्ये ऑनलाईन वर्ग करून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मेश्राम यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.