नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरातून पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. संशयितांकडून सोन्याच्या लगडसह मुद्देमाल असा २ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन (४२, रा. जाधव संकुल, अंबड), मलय आरसन मडसामी (३६, रा. बेलापूर, नवी मुंबई) असे अटक केलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. सोमवारी (ता.५) जत्रा हॉटेल परिसरातील मीरापार्क अपार्टमेंटसमोर पायी जाणाऱ्या महिलेची पोत मोपेडवरून आलेल्या दोघांनी खेचून नेली होती. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे अंमलदार प्रशांत मरकड यांना संशयित अंबडच्या जाधव संकुलात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (ता.६) दुपारी सापळा रचला आणि दोघांना जेरबंद केले.
संशयितांनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, संशयितांना आडगाव पोलिसांकडे सोपविले आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, शरद सोनवणे, नाझीम खान पठाण, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांच्या पथकाने बजावली.