नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ओझर येथून पूजाविधीसाठी आईसोबत रविवारी (दि.४) पंचवटी गोदाकाठी आलेला भावी इंजिनिअर यग्नेश राकेश पवार (२९, रा. लक्ष्मीनगर) हा पाय घसरून नदीत कोसळला होता. यग्नेश पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.
त्याचा सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाने शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. तिसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.६) माडसांगवी येथे आपदा मित्र व अग्निशमन दल जवानांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पथकाने राबविलेल्या शोधमोहिमेत मृतदेह आढळून आला.
रविवारी दुपारच्या सुमारास पूजाविधी आटोपल्यानंतर नीलकंठेश्वर मंदिराजवळून पूजा साहित्य नदीत अर्पण करण्यासाठी गेलेल्या यग्नेशचा निसरड्या दगडावरून पाय घसरला होता. नदीतील पाण्याच्या वेगामुळे तो प्रवाहात वाहून गेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महापालिका अग्निशमन दलाकडून आपदा मित्र व जवानांचे दोन पथके तयार करण्यात आली होती. एक पथक दसकपर्यंत व दुसरे पथक तेथून पुढे नदीपात्रात शोध घेत होते.
मंगळवारी दुपारी चार वाजेनंतर माडसांगवी शिवारातील रेल्वेपुलाखाली पाणवेलींच्या विळख्यात मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसला. त्यांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली. यानंतर तेथून जवळच शोधकार्य करणारे आपदा मित्र शिवम हरक, अथर्व लोहगावकर, किरण खैरे आदींच्या पथकाने तेथे जात स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.