नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक/पुणे (प्रतिनिधी): राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण असून शनिवारपर्यंत मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. ११ जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भापर्यंत त्याचा विस्तार वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. दरम्यान, शनिवारी पुण्यात मान्सूनने दणक्यात हजेरी लावली. सायंकाळी ४.३० वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. अडीच तासात १०१ मिमी नोंद शिवाजीनगरच्या आयएमडी कार्यालयात झाली.
दोन दिवसात मुंबईत:
मान्सूनची पश्चिम शाखा अधिक सक्रिय असून शनिवारी मध्य अरबी समुद्र, रत्नागिरीचा आणखी काही भाग, पुणे जिल्ह्यातील बारामतीपर्यंत त्याने मजल मारली. तसेच तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, आंध्रचा बराचसा भाग मान्सूनने व्यापला. पश्चिमी वारे बळकट होऊन अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प जमिनीकडे येत आहे. याबरोबरच दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत हवेचा ट्रफ पसरल्याने मान्सूनला गती मिळाली. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून दोन दिवसात तो मुंबईसह महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापेल.
नाशिकमध्ये आज मध्यम पावसाचा अंदाज:
राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. रविवारीही अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तर नाशिकसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात त मध्यम पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.