नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.७) सायंकाळी ६ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात अटक केली. अतीश छगन भोईर (वय ४५, रा. मानसी व्हिला बी, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी) असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
भोईर याची जिल्हा रुग्णालयात वर्ग तीनचे कनिष्ठ लिपिक म्हणून नेमणूक आहे. ३५ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीचे सिझेरिअन झालेले असून, औषधोपचाराचा वैद्यकीय खर्च ९२ हजार ३७९ रुपये झाला. या वैद्यकीय बिलाची फाइल तक्रारदाराने शुक्रवारी सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली.
त्यावेळी भोईर याने वैद्यकीय बिलाची फाइल पुढील कार्यवाही करून लवकर आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या ६ टक्क्यांप्रमाणे साडेपाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार शहानिशा करून पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून जिल्हा रुग्णालयातील दालनामध्ये सायंकाळी ६ वाजेदरम्यान ५ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने भोईर यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.