अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हानं सर्वचजण त्रासले आहेत. आता प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. पण आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. मान्सूननं केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिली आहे. हवामान विभागानं यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.
नैऋत्य मोसमी मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारताच्याही बहुतांश भागांत मान्सूननं प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागानं ट्वीट करत दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. अशातच आता मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत. त्यामुळे लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असं 30 मे रोजी हवामान विभागानं ट्वीट करत सांगितलं होतं. अखेर मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा संपली असून मान्सून केरळ आणि त्यासोबतच ईशान्य भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच, येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
यावेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. त्यामुळे केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चक्रीवादळ रेमलचा तडाखा केरळला बसला होता. त्यामुळे मान्सूनचा प्रवाह झपाट्यानं बंगालच्या उपसागरात पोहोचला होता. यामुळे ईशान्येकडेही ढग वाढू लागले आहेत. रामलमुळे शनिवारपासून पश्चिम बंगाल, ओडिशासह ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.