नाशिक ४१. २, भुसावळला उच्चांकी ४७.१ तापमान
मुंबई (प्रतिनिधी): राज्यात उष्णतेची लाट कायम असून गुरुवारी (दि.२३) ३६ पैकी २१ जिल्ह्यांत पारा चाळिशीपार होता. भुसावळला सर्वोच्च ४७.१ तापमान नोंदवले गेले. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांतील पारा चाळीसपार होता.
पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाल्याने कमाल तापमानात घट झाली होती. दरम्यान, आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.
नाशिकमध्ये सलग चार दिवसांपासून कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक असून गुरुवारी अंशतः ढगाळ वातावरणामुळे पारा ०.८ अंशाने घसरुन ४१.२ वर आला होता. रात्रीचे तापमानाही २६ ते २८ अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्याने प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यातील या शहरात पारा चाळिशीपार !
नाशिक: ४१.२, अकोला: ४५.५, मालेगाव: ४२.६, अमरावती: ४३.२, भुसावळ: ४७.१, भंडारा: ४०.२, जळगाव: ४५.५, बुलडाणा: ४२.०, धुळे: ४३.५, ब्रम्हपुरी: ४३.२, नंदुरबार: ४५.२, गडचिरोली: ४२.६, अहमदगर: ४२.२, चंद्रपूर: ४३.२, नांदेड: ४१.०, गोंदिया: ४०.४, परभणी: ४१.१, नागपूर: ४१.९, जालना: ४२.०, वाशिम: ४२.०, संभाजीनगर: ४३.५, वर्धा: ४३.२, बीड: ४३.४, यवतमाळ: ४३.५
पश्चिमेकडील उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट:
पश्चिमेकडून आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.