नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुने नाशिक परिसरात गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या पाच आरोपींना भद्रकाली पोलिसांनी शनिशिंगणापूर व नाशिक येथून अटक केली आहे. भद्रकाली पोलिसांनी केलेल्या या तपासाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 16 मे 2024 रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिकमधील वाकडी बारव, नानावली, झाकीर हुसेन हॉस्पिटलसमोर व शितला देवी मंदिरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी नऊ मोटारसायकल, एक ट्रक व टेम्पो यांना आग लावून या वाहनांची जाळपोळ केली होती. जहांगीर कब्रस्तानजवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला होता.
घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास सुरू केला होता. दरम्यान या सर्व घटनांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास सुरू केला.
या परिसरातील सीसीटीव्हीचे पाहणी करून त्याचे फुटेज घेतले आणि त्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. विना नंबरची गाडी आणि तोंडाला फडके बांधून काही व्यक्ती या परिसरात आल्याचे सीसीटीव्हीत दिसले होते. तो धागा पकडून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
या गुन्ह्यातील सर्व आरोपी शनिशिंगणापूर येथे एका लॉजमध्ये लपून बसल्याचे गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक शनिशिंगणापूर येथे पोहोचले आणि तपास सुरू करत असताना एका लॉजमध्ये पाचही आरोपी असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित दोघांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सनी संजय गावडे (वय 28, रा. पिंपळे गल्ली, म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फड (वय 31, रा. विद्यानगर, मखमलाबाद), प्रवीण बाळू कराटे (वय 24, रा. विद्यानगर, मखमलाबाद), आकाश राजू साळुंके (वय 24, रा. सिडको), विजय सुरेश लोखंडे (वय 28, रा. आडगाव). यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.