नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी द्वारका येथील विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई महिलेस ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गीता हेमंत बोकडे (वय ४५, रा. गणेश वास्तू अपार्टमेंट, अशोका मार्ग, नाशिक) असे लाचखोर महिला शिपाई महिलेचे नाव आहे. इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या तक्रारदार महिलेने विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी द्वारका येथील विद्युत निरीक्षक कार्यालयातील उद्योग ऊर्जा कामगार विभागात अर्ज केला होता. गीता बोकडे याच कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परवान्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल, असे सांगून तक्रारदार महिलेकडे १५०० रुपयांची बोकडे यांनी मागणी केली. त्यानुसार यापूर्वी एक हजार रुपये बोकडे यांनी घेतले होते.
याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करून सोमवारी (ता. १३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ रचला. गीता बोकडे यांनी उर्वरित ५०० रुपये पंचासमक्ष स्वीकारले. पथकाने लाचखोर महिला बोकडे यांना अटक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, हवालदार ज्योती शार्दुल यांनी केली.