नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ‘कॉलेज परिसरात कॅफे चालवून विद्यार्थ्यांना आडोसा करून देतो, तुझ्यावर कारवाई करतो’, असे धमकावत कॅफेचालकांकडून दरमहा तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली. लाचखोर गोसावी हा आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत आहे.
तक्रारदार याचे शहरातील एका कॉलेजच्या परिसरामध्ये कॅफे आहे. याठिकाणी जोडप्यांना आडोसा मिळावा, यासाठी विभागणी केलेली होती. सहा महिन्यांपूर्वी लाचखोर गोसावी याने कॅफेचालकाची भेट घेत कारवाईचा दम देत त्याच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये लाच घेत होता.
यामुळे त्रस्त झालेल्या कॅफेचालकाने गोसावी यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. संशयित गोसावी हा विशेष शाखेत कार्यरत असतानाही त्याने संबंध नसतानाही कॅफेचालकाकडे लाच मागितल्याचे उघड झाले.
बुधवारी (ता. ६) तक्रारदार यांच्याकडून दोन हजार ५०० रुपये लाचची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.