नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंस्टाग्राम या समाज माध्यमावर तलवारीचे प्रदर्शन करून व व्हिडिओ बनवून त्याचे रील प्रसारित करणे दोघा तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या तरुणांचा शोध घेत त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. त्यांना या तलवारी उपलब्ध करून देणाऱ्यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एका पल्सर मोटरसायकल वर बसून हातात असलेली तलवार हवेत फिरवताना व्हिडिओ रिल बनवून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने माहिती दिली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंस्टाग्रामवरील या रिल्स ची पडताळणी केली. सदर रील बनवणारे व अपलोड करणारे यांचे वर्णन घेऊन गुन्हे शाखेचे पथक सिन्नर मध्ये या तरुणांचा शोध घेत होते. सातपीर गल्ली परीसरात ते दोघे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता रुषिकेश राजेंद्र बोरसे, वय-२४ रा वावीवेस सिन्नर व धिरज बाळु बर्डे, वय-२१ वर्षे रा सातपीर गल्ली, सिन्नर अशी त्यांची ओळख पोलिसांनी पटवली.
रिल्स मधील तलवारीबाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील ढोके नगर भागात राहनारा गुरुनाथ भागवत हळकुंडे याचेकडुन घेतली असल्याचे सांगितले. गुरुनाथ हळकुंडे यास हॉटेल शाहू परिसरातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
तलवारींबाबत विचारले असता त्याने दोन तलवारी पंजाब अमृतसर येथून विकत आणल्या असल्याची कबुली दिली. मनेगाव रोड येथील गाईच्या गोठ्यात या तलवारी लपून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पंचांचे समक्ष या तलवारी पोलिसांनी गोठ्यातून जप्त केल्या.
हवालदार सतिष जगताप, पोलीस शिपाई विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम, कुनाल मोरे यांचे पथकाने ही करवाई केली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोघे रील स्टार व त्यांना तलवार पुरवणारा अशा तिघांविरुद्ध कायद्याने बंदी असलेले प्राणघातक हत्यार बाळगणे व त्याचे प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.