नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
मनोहर जोशींचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतर केले. त्यांनी एम ए आणि एलएलबीची पदवी घेतली. मुंबईत कोहिनूर नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले होते. याशिवाय मुंबई पालिकेत अधिकारी पदावर कामही केले. 1976-1977 काळात ते मुंबईचे महापौर होते.