वाढीव पोलिस कोठडीचा अधिकार राखीव: कारागृहात रवानगी
नाशिक (प्रतिनिधी): दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील तिडके कॉलनीमधून अटक केलेला इंजिनीअर असलेला आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.५) न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्याची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने एटीएस पथकाने त्यास न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी हुजेफची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्या साथीदारांचा एटीएसकडून आता शोध सुरू आहे.
डेटाचे तांत्रिक विश्लेषण सुरू:
• हुजेफ याने सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या संशयितांसोबत संवाद साधल्याची क्लिपही पथकाच्या हाती आली आहे. त्याने युनायटेड किंगडम, मलेशिया, अमेरिका, कतार या देशांमध्ये कॉलिंग केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
• याबाबत सीडीआर तपासला जात असून, त्याचे विश्लेषण केले जात आहे. यावरून जे संशयित निष्पन्न होतील, त्यांचा माग एटीएसकडून काढला जात आहे. लॅपटॉप, मोबाइल, पेनड्राइव्हचा तांत्रिक तपास व विश्लेषण केले असता एटीएसच्या पथकाला ४०० एमबीचा डेटा हाती लागला आहे.
• व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, आयएमओ यासारख्या अॅप्लिकेशनचा वापर करीत केलेल्या संभाषणाचा हा डेटा असून, त्याची पडताळणी करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात एटीएसच्या पथकाने संशयित हुजेफ यास तिडके कॉलनीमधून अटक केली होती. त्यास न्यायालयाने आतापर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिस कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने न्यायालयाने त्यास येत्या २० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
यावेळी दहशतवादविरोधी पथकाच्या तपासी अधिकारी यांनी १६, दिवसांच्या पोलिस कोठडीचा अधिकार राखीव ठेवला आहे. या सुनावणीप्रसंगी न्यायालयात सरकार पक्षाकडून विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर हे उपस्थित होते.
दरम्यान, हुजेफ याचा मनी ट्रेल, दुबईमार्गे हवालाचा ट्रेल न्यायालयापुढे मांडण्यात आला आहे. त्याच्या उर्वरित साथीदारांचा एटीएसकडून शोध सुरू आहे. जेव्हा, त्याचे साथीदार हाती लागतील तेव्हा, पुन्हा गरज भासल्यास हुजेफ याची पोलिस कोठडीची मागणी एटीएसकडून न्यायालयाकडे केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.