नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहराच्या विविध भागातून चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात अत्यंत कमी किमतीमध्ये विकणाऱ्या दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.
संशयितांकडून १३ लाख ३५ हजारांच्या चोरलेल्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
विशाल मधुकर धांडे (३८, रा. महादेव मंदीराजवळ, केवल पार्क, अंबड), मोहन शालीग्राम ढाके (३७, रा. ओंकारेश्वर महादेव मंदीराजवळ, स्वामीनगर, अंबड) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याविरोधात धुळे जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत होते. यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेशाखांना तपासाचे आदेश दिले होते
त्यानुसार शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथक तपास करीत असताना, दोन दुचाकी चोरटे चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी सिडको परिसरात येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना मिळाली होती.
त्यानुसार, पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस चौकशीमध्ये संशयितांनी शहरभरातून एक डझनपेक्षाही अधिक दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले.
यातील पाच दुचाकी या दोघांनी गेल्या पंधरा दिवसात चोरलेल्या आहेत. संशयितांकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहायक उपनिरीक्षक यशंवत बेडकोळी, बाळु शेळके, प्रशांत वालझाडे, शंकर काळे, चंद्रकात गवळी, विजय वरंदळ, सुनिल आहेर, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, संजय सानप, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, राजेंद्र घुमरे, मधुकर साबळे, अतुल पाटील, नितिन फुलमाळी, प्रविण वानखेडे यांनी बजावली.