नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने मंदिर व मंदिर परिसरातील ओसऱ्यांच्या नूतनीकरणास विशेष बाब म्हणून एक कोटी ८२ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.
शिल्पकलेचा उत्तम नमुना, पूर्वाभिमुख असलेल्या काळाराम मंदिरात तीन दालने आहेत. पहिल्या दालनात घंटा, दुसऱ्या दालनात पूर्व, उत्तर व दक्षिण असे तीन दरवाजे आहेत. तिसऱ्या दालनात गाभारा आहे. गाभारा आणि दुसरे दालन यांच्यामधील बांधकामावर पावसाचे पाणी झिरपत खाली येते. काही ठिकाणी झिरपलेल्या पाण्याने बांधकामावर पांढरा थर साचतो.
त्यामुळे येथील ओसऱ्याचे काम करणे क्रमप्राप्त आहे. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामाची तपोभूमी असलेल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिर आरती करणार आहे.
त्यामुळे काळाराम मंदिराच्या रखडलेल्या विकासकामांचा वनवासही आता संपणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंदिराच्या ओसरी नूतनीकरण होणार आहे.
”रामाच्या नावावर आम्हाला राजकारण करायचे नाही. इथे येऊन कोण आरती करणार, कोण अधिवेशन घेणार याबाबत मी काही बोलणार नाही. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. आपण सेवा करणे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. काही लोकांना २४ तास राजकारण करायचे आहे. श्री रामाच्या जन्मभूमीवर मोठे मंदिर व्हावे. तिथे आज मंदिर होत आहे. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.”- दादा भुसे, पालकमंत्री