नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सामनगाव येथून जप्त केलेल्या एमडी प्रकरणात सहभागी असलेल्या एका सराईताला अटक करण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे.
अक्षय नाईकवाडे (वय २७) असे संशयिताचे नाव असून, मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे या गुन्ह्यातील महत्त्वाच्या माहितीची उकल होण्याची शक्यता बळावली आहे.
सामनगाव येथील संशयित गणेश शर्मा याच्याकडून नाशिकरोड पोलिसांनी साडेबारा ग्रॅम एमडी जप्त केले होते. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून या गुन्ह्यात दहाहून अधिक संशयितांची धरपकड केली.
एमडी तयार करण्यासाठी सोलापूरात उभारण्यात आलेल्या कारखान्यासह गोदामाचाही पर्दाफाश झाला. पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या एमडीसह, कच्चा माल, एमडी तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री हस्तगत केली. आतापर्यंत या गुन्ह्यातील १५ संशयितांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.
…असा घेतला शोध:
मुख्य संशयितांपैकी एक असणारा नाईकवाडे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो जात असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या सूचनेनुसार गुंडा विरोधी पथक नाईकवाडे याचा शोध घेत होते.
पथकातील अंमलदार प्रदीप ठाकरे यांनी नाईकवाडे याच्याकडील मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून तो सध्या कोठे आहे, याची माहिती मिळविली. त्याचा भोपाळ येथील पत्ता शोधून त्यानुसार पथकाने भोपाळ गाठून नाईकवाडे याला भोपाळ रेल्वे स्टेशनबाहेरील झोपडपट्टी परिसरातील एका हॉटेलातून ताब्यात घेतले. त्याला नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांच्या पथकाने नाईकवाडे याला अटक केली.
![]()


