नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या ३ वर्षांपासून विविध कारणामुळे रखडलेल्या ५० इलेक्ट्रिकल बसेस संचलनाची योजना रद्द झाल्यानंतर आता केंद्र शासनाच्या पीएम इ-बस योजनेमधून नाशिक महापालिकेला शंभर इलेक्ट्रिकल बसेस देण्याचे जवळपास निश्चित झाले होते.
मात्र, आत्ताच्या सिटी लिंकला गेल्या अडीच वर्षात १०० कोटी रुपये तोटा झाल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी १०० ऐवजी ५० इलेक्ट्रिकल बसेस घेण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.
निवडणुकांमुळे केंद्राने राज्यातील २३ पालिकांमध्ये इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पालिकेला १०० बसेस मिळणार होत्या. पालिकेला फक्त चार्जिंग स्टेशन्स व डेपो उभारावे लागणार होते.
यापूर्वी शहरामध्ये सुरू असलेल्या अनेक बसेस रिकाम्या फिरत असल्यामुळे पुन्हा तोट्याकडे दुर्लक्ष करून ५० अतिरिक्त बस घेण्याचा निर्णय टीकेचे कारण बनू शकतो हे लक्षात घेत पालिकेने बॅकफूटवर येत १०० ऐवजी आता फक्त ५० इलेक्ट्रिकल बसेस केंद्राकडून मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठेकेदाराला प्रति किलोमीटरचे भाडे अदा केले जाईल. एका बससाठी दिवसाला पंधरा हजार याप्रमाणे पन्नास बसेससाठी साडेसात लाख रुपये मोजावे लागणार आहे.
“इलेक्ट्रिक बस प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार समितीने नुकताच नाशिकचा आढावा घेतला. सध्याचे बस व्यवस्थापन, डेपो, चार्जिंग स्टेशनची याचा अहवाल देणार आहे.” – बाजीराव माळी कार्यकारी अभियंता, यांत्रिक विभाग