नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम प्रकल्पांमुळे गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बिल्डरांना द्याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त व नगर रचना विभागाला बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी याबाबत निवेदन दिले आहे.
गोविंदनगर, सद्गुरुनगर, तिडकेनगर, जगतापनगर, कर्मयोगीनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, कृष्णबन कॉलनी, बेळे कॉलनी, बाजीरावनगर आदी भागासह प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणात गृह व व्यावसायिक प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी पत्रे लावलेले नाहीत, अन्य उपाययोजना केलेल्या नाहीत, यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होवून अक्षरश: धुळधाण झाली आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी धुळीचे प्रदूषण रोखले जावे, बांधकाम प्रकल्पांवरील धुळ इतरत्र जावू नये, यासाठी पत्रे लावण्याची व अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना बिल्डरांना द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, भालचंद्र रत्नपारखी, दिलीप निकम, दिलीप जगताप, बाळासाहेब देशमुख, अनंत संगमनेरकर, आनंदा तिडके, शिवाजी मेणे, संदीप गहिवाड, योगिता गहिवाड, मगन तलवार, अशोक पाटील, डॉ. शशिकांत मोरे, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे आदींनी केली आहे.
आरोग्य धोक्यात: धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे विकार वाढले आहेत. ज्यांना मुळात श्वसनाचा आजार आहे, त्यांचे आजार बळावत आहे. सकाळ व सायंकाळी चालण्यासाठी बाहेर पडणे अवघड झाले असून, नागरिक तोंडावर मास्क लावून बाहेर पडत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरांमध्ये साफसफाई केली जात आहे. मात्र, जास्त धुळीमुळे आणखी अस्वच्छता वाढत आहे.