नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांना पुण्याला जाण्यासाठी आणि पुणेकरांना नाशिकला येण्यासाठी सोयीची असलेली पुणे-नाशिक-भुसावळ (हुतात्मा एक्स्प्रेस) ही रेल्वेगाडी आता नाशिकमार्गे धावणार नाही, हे निश्चित झाले आहे.
ही गाडी दौड, नगरमार्गे अमरावतीला नेली जाणार आहे. रेल्वे मंडळाने तशी सूचना मध्य रेल्वेला केली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
नाशिक रोड, लासलगाव, निफाड, कल्याण, पनवेल ते पुणे लिंकवरील लोकल प्रवाशांना आणि विशेषत: नाशिक-पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्यांना पुण्याला जाणारी आरामदायी, स्वस्त गाडीच आता नसेल.
नाशिककरांच्या प्रयत्नानंतर सुरू झालेली ही एक्स्प्रेस काही महिन्यांपासून बंद होती, तेव्हापासूनच ही गाडी हिरावली जाणार, अशी अटकळ होती. नाशिककरांना तिचे तिकीट कुटुंबासाठी अत्यंत परवडणारे होते.
रस्ता वाहतुकीपेक्षा ही गाडी जास्त सुरक्षित, आरामदायी होती. घाटातील व्यस्त मार्गाचे कारण देत ही गाडी जानेवारीपासून बंद करण्यात आली. पुणे-भुसावळ ही गाडी आता दौंड, अहमदनगर, मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत नेण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. ‘पुणे-भुसावळ’ऐवजी ही गाडी ‘पुणे-अमरावती’ अशा नावाने धावणार आहे.
उरळी, दौंड कोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथे ती थांबेल, असे रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक संजय नीलम यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.