नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसून, ऑक्टोबरच्या गेल्या २६ दिवसांतच डेंग्यूचे नवीन १९३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा आता ७१५ वर पोहोचला आहे. सातपूर आणि नाशिकरोड परिसरात सर्वाधिक डेंग्यूचा प्रकोप पहायला मिळत आहे.
यंदा पावसाळा संपूनही शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे महापालिकेच्या मलेरिया विभागाने डेंग्यू निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली. डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी आढळलेल्या १०१२ मिळकतधारक, संस्था, खासगी तसेच शासकीय कार्यालयांना महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शहरात यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही डेंग्यूबाधित रुग्णांचा एकूण आकडा ७१५ वर पोहोचल्याने नाशिक डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहे. जुलैपर्यंत शहरात अवघे १४४ डेंग्यूचे रुग्ण होते. ऑगस्टपासून पाऊस गायब असल्याने डेंग्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. परंतु, ऑगस्टमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढून ११७ डेंग्यूचे रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात डेंग्यू बाधितांच्या आकड्याने नाशिकमध्ये नवा उच्चांक गाठला. या महिन्यात तब्बल १०६६ डेंग्यूचे सशंयित रुग्ण आढळले, त्यापैकी २६१ रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
पावसाळा परतल्यामळे ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा कमी होईल, अशी अपेक्षा होती. सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातही डेंग्यूचा प्रकोप कायम राहिला आहे. २६ ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे तब्बल १९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे चालू वर्षात डेंग्यूबाधितांचा आकडा हा ७१५ पर्यंत पोहचला आहे. हा सरकारी रुग्णालयांतील आकडा असून, खासगी रुग्णालयांतील रुग्णसंख्या त्याहूनही अधिक असल्याने शहरवासीय धास्तावले आहेत.
दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा:
चालू आठवड्यात शहरात डेंग्यू संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. सदरचे दोन्ही रुग्ण हे डेंग्यू संशयित असले तरी त्यांना वेगवेगळे आजार असल्याने या आजारातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला असला तरी, खबरदारी म्हणून या दोन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमुने हे अधिक तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयांकडून दोन्ही रुग्णांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅबला पाठविण्यात आलेत. एनआयव्हीच्या अंतिम अहवालानंतरच डेंग्यू झाला की, नाही हे निश्चित होणार असल्याने या अहवालाकडे लक्ष लागून आहे.