नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पोलिसांनी सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून दहा कोटी रुपयांच्या ‘एमडी’सह कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी चक्क सोलापुरात नशेची फॅक्टरी तयार केल्याची बाब उघड झाली आहे.
सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने एका साथीदारामार्फत नाशिकमध्ये एमडी पुरविण्यासाठी सोलापुरात कारखाना सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी सनीच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या सामनगाव परिसरात सप्टेंबर महिन्यात १२ ग्रॅम ‘एमडी’सह एका तरुणाला अटक केल्यानंतर पोलिसांनी मुळापर्यंत तपास करून थेट एमडी तयार होणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
अमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संयुक्तरित्या शुक्रवारी सोलापूर ‘एमआयडीसी’त ही कारवाई केली. सामनगाव एमडी प्रकरणातील संशयितांच्या चौकशीत पथकांना मिळालेल्या माहितीनुसार पथक सोलापुरात रवाना झाले होते. तेथे धाड टाकून संशयिताला ताब्यात घेत कारखाना ‘सील’ केला. नाशिकमधील संशयितांच्या मदतीनेच हा कारखाना सुरू करण्यात आलेला होता. या कारखान्याची इतर साखळी शोधण्यासाठीही पथके रवाना झाली आहेत.
घरांमध्ये सात किलो एमडी:
नाशिक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी संशयित पगारे व पिवाल यांच्या घरझडतीसह त्यांच्या इतर मालमत्तेची तपासणी केली. त्यावेळी पगारे याने एका खोलीत काही एमडी लपविल्याचे स्पष्ट झाले. संशयितांपैकी एकाने दुसऱ्या व्यक्तीला पैसे देण्याच्या बदल्यात गहाण घेतलेल्या खोलीत ‘एमडी’चा साठा केल्याचे समोर आले. एकूण सात किलो एमडी पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर ‘सोलापूर कनेक्शन’ उघड झाले.
ड्रग्ज प्रकरणात नाशकात तीन वेगवेगळे गुन्हे:
आतापर्यंत नाशकात ड्रग्ज प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वात पहिला गुन्हा ललित पाटील ड्रग प्रकरणात दाखल करण्यात आला होता. यासंबंधित गोडाऊन नाशिक पोलिसांनी उध्वस्थ केले होते. याचा तपास स्वतंत्रपणे नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणातील गुन्हेगार मुंबई आणि पुण्यातील आरोपींशी संबंधित आहेत. पण काल (शुक्रवारी) पोलिसांनी जी कारवाई केली आहे, ती एका ड्रग रॅकेटसंदर्भातील आहे.
नाशिकमध्ये ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आरोपींनी सोलापुरात कारखाना सुरू केला होता. गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी सोलापुरात आणखी एक कारखाना उध्वस्त केला होता. ते प्रकरण आणि कालचं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या कारखान्यात प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती. त्यासोबतच ड्रग्जचा साठा, कच्चा मालही सापडला आहे.
नाशिकच्या वडाळागाव परिसरात छोटी भाभीचं ड्रग रॅकेट होतं. तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. आतापर्यंत चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, नाशिक पोलिसांची ड्रग्स प्रकरणातील कारवाई सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे.