नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंधरावा वित्त आयोगाने अनुदान हवे असेल तर नियमित उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ करण्याबाबत दिलेल्या सूचना, सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी अदा कराव्या लागणाऱ्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेसाठी तजवीज तसेच दिवाळीत ठेकेदारांना देयके अदा करण्यासाठी महापालिकेला आर्थिक निकड आवश्यक असून त्यासाठी ४७०.३७ कोटींच्या वसुलीसाठी विविध कर विभागाने टॉप गिअर टाकला आहे.
जवळपास दोन लाख ३७ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील वसुलीसह मागील थकबाकीपोटी ४७० कोटी रुपये कर विभागाला वसुल करायचे असल्याने पहिल्या टप्प्यात बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर आता उर्वरित थकबाकीदारांविरोधातही करवसुली विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
घरपट्टी थकीत असलेल्या २ लाख ३७ हजार ८८५ मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८३७४ थकबाकीदारांनी पूर्ण तर १२ हजार १३१ थकबाकीदारांनी काहीप्रमाणात थकबाकी भरली आहे. १३.१८ कोटी रुपयांची थकबाकी जमा होऊ शकली आहे. ती वसूल करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
घरपट्टीत २६ कोटींची वाढ:
गतवर्षी १ एप्रिल ते २२ आॉक्टोबर २०२२ या कालावधीत घरपट्टी वसुलीतून पालिकेला १०३.९५ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा त्यात २५.७६ कोटीची वाढ होऊन आतापर्यंत १२९.७२ कोटींचा महसूल मिळाला आहे. विविध मार्गाने घरपट्टी वसुलीसाठी गेल्या काही दिवसांपासून पालिकेने कंबर कसली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790