नाशिक (प्रतिनिधी): विल्होळी येथील प्लॅस्टिक मोल्डिंगच्या एका रांगेत असलेल्या तीन कंपन्यांना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. यात तिन्ही कंपन्यांचे एकूण ४.५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
अग्निशामक दलाच्या ४ बंबांनी तीन फेऱ्या मारत सुमारे तीन तासात ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत यंत्रसामग्री व कच्चा माल जळून खाक झाला आहे.
विल्होळी येथील प्रशांत व डॉ. संदीप मानकर यांच्या मालकीच्या ब्रॉस प्लास्टिक कंपनीला मोठी आग लागली. आगीचे लोळ पसरून शेजारील दोन कंपन्यांनाही आग लागली.
सिडको अग्निशमन केंद्राचे फायरमन मुकुंद सोनवणे, श्रीराम देशमुख, कांतीलाल पवार, भिमा खोडे, वाहनचालक इस्माईल काझी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत ब्रॉस प्लास्टिक या कंपनीचे अंदाजे ३.५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर डागा प्लास्टिकचे १ कोटीचे व प्रमोद फायबर या कंपनीचे अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी सुटी असल्याने कपंनीचे कामकाज बंद होते. या आगीचे कारण मात्र समजू शकले नसून पोलिस तपास सुरू आहे.