…तर २५ तारखेपासून कठोर उपोषण, पाणीही नाही घेणार; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

अंतरवाली, जालना (प्रतिनिधी):  मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी 24 ऑक्टोबरची मुदत दिली होती. सरकारला दिलेली मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला दिलेला वेळ संपत आहे. राज्य सराकरने २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीत तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कुठल्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेतल्यानंतर गावात यायचं. महाराष्ट्रभर सर्कलमध्ये २५ तारखेपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. २८ पासून तेच साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार आहे, याची तयारी मराठा समाजाने केली आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात मराठा समाजाने सरकारला जागे करण्यासाठी एकत्र यावे. व शांततेत आंदोलन करावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिले तर गुलाल भरुन गाड्या येतील. नाहीतर माणसं भरून गाड्या येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र आंदोलन शांततेत होणार. संपूर्ण देश शांततेचं युद्ध कसं असतं हे पाहणार आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने आमचे लोक आमच्या विरोधात उतरवले आहेत. मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावं. कुणीही आत्महत्या करु नये. राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही. सरकारला ४० दिवस देऊन सन्मान केला. आता २५ तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790