नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक/ पुणे (प्रतिनिधी): ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिला ललित पाटील याच्या मैत्रिणी असल्याची माहिती आहे. ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे.
ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे पोलिस देखील या प्रकरणाचा आणखी कसून तपास करत आहेत. त्यानुसार त्यांनी कालच नाशिकमधून प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम या दोन्ही महिलांना अटक केली असल्याचे सूत्रांकडून समजते. ललित पाटील हा ससूनमधून पळाल्यानंतर तो आधी नाशिकला गेला होता. तो नाशिकला गेला तेव्हा त्याला या महिलांनी पैसै दिले तसेच त्यांची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
सातत्याने दोघींच्या संपर्कात:
ललित पाटीलचे जमा झालेले पैसे आणि त्याचे सोने देखील या दोन महिलांकडे होते अशी माहिती पोलिसांकडे आहे. आज या महिलांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ललित पाटील हा फरार असल्याच्या काळात देखील सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. ड्रग्सच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून या दोन्ही महिलांना अटक केली आहे.
ससून रुग्णालयातून झाला होता पसार:
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी इथून अटक केली. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियाच्या कॅमेरॅसमोर बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे. ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे दोघे मूळचे नाशिकचे असून त्यांनी त्याठिकाणी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देत तो पळून गेला, त्यामुळे पुणे पोलिसांची बदनामी झाली.