नाशिक: ‘त्या’ २७ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू अपघात नव्हे तर खून

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या सहा दिवसापूर्वीच न्यायडोंगरी गावात एका पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या साह्याने आपल्याच पतीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा न्यायडोंगरी गावात दुसरा खुनाचा गुन्हा घडल्याने संपूर्ण न्यायडोंगरी गाव हादरून गेले आहे.

डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे (वय २७) रा. न्यायडोंगरी असे मयत महिलेचे नाव असून तिला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारले अशी फिर्याद मयत भाग्यश्री शेवाळे हिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे (राहणार, तितरखेडा, तालुका, वैजापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम रॉयल लॉन्सच्या बाजूला वाळुंज तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नांदगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,३०४ (ब) ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकराच्या दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्री ही मयत झाल्याचे सांगितल्याने चाळीसगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परंतु, सदरचे घटनास्थळ नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा ०० नंबरने नांदगाव येथे वर्ग करण्यात आला होता.

त्यानंतर दि.१० ऑक्टोबर रोजी तब्बल १५ दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण भाग्यश्री हिच्याकडे पती डॉक्टर किशोर नंदू शेवाळे व तिचे सासरे नंदू राघो शेवाळे हे नेहमी ‘तू तुझ्या माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये’ अशी मागणी वेळोवेळी करत होते. परंतु, सदरची मागणी भाग्यश्री हिच्याकडून पूर्ण न झाल्याने केवळ २५ लाख रुपयांसाठी संशयित आरोपी डॉ. किशोर नंदू शेवाळे व त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांनी संगनमताने व विचारपूर्वक फिर्यादीची बहीण डॉक्टर भाग्यश्री हिला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास उप उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर हे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790