नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी अखेर महापालिकेने पुढाकार घेतला असून पुणे व नागपूर पॅटर्नचा वापर करून ३८ जागांवर कंपन्यांना मोबाइल टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. नाशिक महापालिकेत उत्पन्नवाढीसाठी विविध स्त्रोत शोधले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून, पालिकेच्या इमारती, रस्ते दुभाजक, मोकळे भूखंड, शौचालये, जलतरण तलाव, महापालिकेच्या सभागृहांच्या जागेवर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम, नगर नियोजन, पाणीपुरवठा, वाहतूक सेल व मिळकत विभागांच्या प्रमुखांची समिती काम करीत आहे. ज्या इमारतीवर असे टॉवर आहे, त्याचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेटही नाही. घरपट्टी विभागाकडे त्याची नोंद नाही. त्यामुळे विविध कर विभाग व नगररचना विभागाने मध्यंतरी संयुक्तरित्या टॉवर सील करण्याचा प्रयत्न केला. सध्या, शहरात ८०६ मोबाइल टॉवरपैकी १२५ मोबाइल टॉवर अधिकृत आहेत.
पन्नास कोटींचे उत्पन्न मिळणार:
नागपूर व पुणे महापालिकेच्या धर्तीवर पालिकेच्या मिळकतींवर टॉवर उभारण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यातून पन्नास कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. – श्रीकांत पवार, उपायुक्त